Pages

Monday 17 May 2021

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती



जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.


तो भारताचा नागरिक असावा.

त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.


तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे. 

अध्यक्षांची कार्ये

जिल्हा परिषदेची सभा बोलाविणे व तिचे अध्यक्षस्थान भूषविणे.अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात.

जिल्हा परिषद अध्यक्ष हाच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

अध्यक्षास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा व विभागीय आयुक्तांना सादर करण्याचा अधिकार आहे.

अध्यक्ष या नात्याने तो जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो.

अध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषदेची कोणतीही कागदपत्रे तपासण्याचा अधिकार त्यास आहे.

अभयराजे एकनाथ कापसे. 

LAW STUDENT, SPPU PUNE,

 ९३७३०००७०२ कोल्हापूर.