Pages

Saturday 26 March 2022

सातबारा म्हणजे काय? (भाग २)

⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*


❇️ सातबारा म्हणजे काय? (भाग २)



७/१२ चे भाग

७ नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर १२ नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण ७/१२ मध्ये केलेले असते. प्रत्‍येक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो. ७/१२ पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते.

७ अ) उतार्याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो.सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नं. दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नं किंवा गट नं म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नं मध्ये दाखविलेले असते.त्याजवळच जमिन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमिन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते.

१. भोगवटादार वर्ग-१ म्हणजे ही जमिन वंशपरंपरेने चालत आलेली, मालकीहक्क असलेली असते. यालाच खालसा असेही म्हणतात.

२. भोगवटादार वर्ग-२ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी. जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री,भाडेपट्टा,गहाण,दान्,हस्तांतरण करता येते.

४. त्याखाली जमिनीचे 'लागवडीचे योग्य क्षेत्र' यात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते.

५. त्याखाली पो.ख. म्हणजे 'पोट खराबा' म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते.

६. त्याखाली 'आकार',जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.

७. गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते. प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमिन विकत देणार्याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.

७ (ब) गावनमुना ७च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते.

१. 'इतर हक्क' मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणार्याच्या नावाची नोंद असते. या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते. इतर हक्क सदरात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे आवश्यक असते.

२. काही वेळेला संपूर्ण जमिन न घेता त्यातील काही भागचं विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात. इतर हक्क मध्ये 'तुकडेबंदी' असे नमूद केलेले असेल तर ती शेतजमिन असेल तर ती शेतजमिन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही.

___________

७/१२ मधील कुळांच्या नोंदी

कसेल त्याची जमीन असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणार्या कायदेशीर कूळाची नांवे ७/१२ च्या इतर हक्कात नोंदली गेली.

त्यानंतर १९४८ चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्यानुसार कलम-३२-ग नुसार दिनांक १.४.१९५७ रोजी दुसर्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणार्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहिर करण्यांत आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकालाप्रमाणे कूळांच्या मालकीच्या झाल्या. 

कूळ कायदा कलम-३२ (ओ) नुसार आजही दुसर्याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेलतर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत.

(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे.

(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.

(क) तो खंड देत असला पाहिजे.

(ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नातेसंबंध असले पाहिजेत.

आजकाल जमीन मालक स्वत:हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारणपणे करतात.

__________

७/१२ पुर्नलेखन

एकूण दहा वर्षांच्या पिकांची आकडेवारी लिहिण्याची तरतूद ७/१२ साठी असते. दर दहा वर्षांनी ७/१२ नव्याने लिहावा लागतो.

दहा वर्षांच्या आतमध्ये फेर जमाबंदी लागू झाल्यास वा एकत्रीकरण योजना राबविली गेल्यास नवीन क्षेत्र आणि आकारणी दर्शवून व जुन्या नमुन्यातील इतर तपशिलाची पुन्हा नक्कल करून पुढील कार्यपद्धती अवलंबून प्रस्थापित करावा. 

१) सर्व अद्ययावत फेरफारांची गाव नमुना ६ मध्ये नोंद करण्यात आली आहे हे पाहावे. 

२) सर्व फेरफार प्रमाणित केलेले असावेत. 

३) गाव नमुना ७/१२ मधील दुरुस्त्या पूर्ण करणे व तपासणे. 

४) कोणतीही कारकुनी चूक किंवा वगळल्या गेलेल्या गोष्टी याविरुद्ध खबरदारी घेण्यासाठी गाव नमुना ७ मधील कब्जेदाराच्या, कुळाच्या किंवा इतर अधिकारधारकांच्या नावासमोर देण्यात आलेल्या गाव नमुना नं. ६ फेरफार नोंदीच्या संदर्भात स्वतंत्रपणे तपासून त्याचा ७/१२ वर इफेक्ट आहे हे पाहावे. 

७/१२ चे पुर्नलेखन पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी ७/१२ चे प्रत्येक पण तपासून पाहावे. व त्यांच्यानंतरच जनतेला पाहण्यासाठी १५ दिवस उपलब्ध करून ठेवावेत. व त्यानंतर तहसीलदार यांच्याकडून ७/१२ प्रख्यापनासाठी तारीख निश्चित करून घेवून त्याप्रमाणे गावात जाहीर नोटीस काढून जनतेला कळवावे.

___________

गाव नमुना सात-बारा लिहितांना घ्‍यावयाची काळजी :

अ. दर दहा वर्षांनी गाव नमुना सात-बाराचे पुनर्लेखन करण्‍यात येते.

आ. गाव नमुना सात-बाराचे पुस्‍तक १०० ते १५० पानाचे असावे. ते चांगले बांधलेले असावे तसेच त्‍याला जाड पुठ्‍ठ्‍याचे कव्‍हर असावे.

इ. गाव नमुना सात-बाराचे पुस्‍तक लिहितांना कधीही, कुठेही खाडाखोड करु नये.

ई. गाव नमुना सात-बारा पुनर्लेखनाच्‍यावेळेस जुन्‍या गाव नमुना सात-बाराच्‍या पानावरील सर्व फेरफार क्रमांक पुनर्लिखीत गाव नमुना सात-बाराच्‍या पानावर (कंसात) वरील बाजुला लिहिणे आवश्‍यक आहे. याकडे काटेकोरपणे लक्ष द्‍यावे.

उ. रद्‍द झालेली, अधिकार संपलेली (कंस झालेली) नावे पुनर्लेखनाच्‍यावेळेस नवीन गाव नमुना सात-बाराच्‍या पानावर लिहिण्‍याची आवश्‍यकता नसते. परंतु त्‍यांचे फेरफार क्रमांक न चुकता लिहावेत.

ऊ. पुनर्लेखनानंतर गाव नमुना सात-बारा पुन्‍हा तपासून पहावा. जुनी गाव नमुना सात-बारा पुस्‍तके तहसील कायार्लयातील अभिलेख कक्षात जमा करावी.


अभयराजे एकनाथ कापसे.

LAW STUDENT, SPPU PUNE,

९३७३०००७०२ कोल्हापूर.

No comments:

Post a Comment